श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन ; पारंपरिक पद्धतीने गुलाल व फुलांची मुक्त उधळण.
पुणे : श्री काळ भैरवनाथ महाराज की जय.. चा अखंड जयघोष आणि पारंपरिक वाद्य ढोल-ताशा व बँड च्या निनादात पालखी खांद्यावर घेताच फुले आणि गुलालाची झालेली मुक्त उधळण... अशा भक्तीमय वातावरणात कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांची पालखी आणि बगाड मोठया उत्साहात साजरे झाले. शेकडो वर्षांची परंपरा जपत साजरा झालेला बगाड उत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळ भैरवनाथ मंदिर तर्फे कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळ भैरवनाथ महाराजांच्या उत्सवांतर्गत पालखी व बगाड उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९ वाजता मुख्य बगाड सोहळा मोठया उत्साहात पारंपरिक पद्धतीने पार पडला. त्यानंतर महापूजा व आरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी सकाळी ६.३० वाजता लघुरुद्र व आरती, दुपारी १२ वाजता अष्टोत्तरी नामावली व माध्यान्ह आरती झाली. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात.
मंदिराला फुलांची आकर्षक आरास व विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूवीर्ची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. त्यामुळे या मंदिराला व येथील उत्सवाला विशेष महत्व आहे.
टिप्पणी पोस्ट करा