इनोव्हेशन फाउंडेशन' आयोजित 'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' राष्ट्रीय स्तरीय हॅकेथॉनचे २२ फेब्रुवारीला उ‌द्घाटन - ३५० हून अधिक संघ सहभागी, यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार 'बालाजी जाधव' यांना जाहीर.

राष्ट्रीय स्तरावरील 'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०'चे भव्य उद्घाटन – ३५० हून अधिक संघांचा सहभाग, इनोव्हेशन पुरस्कार 'बालाजी जाधव' यांना जाहीर!

पुणे : विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्‌द्देशाने इनोव्हेशन फाऊंडेशन च्या वतीने आयोजित 'इनोव्हेट यू टेकॅथॉन २.०' या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ येत्या शनिवारी 22 फेब्रुवारी  रोजी होणार आहे. या हॅकेथॉनमध्ये आयआयटी, ट्रिपलआयआयटी यांच्यासह देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महावि‌द्यालयातील ३२७ संघातील सुमारे १ हजार २०० विद्यार्थी सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध लावणार आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना आणि लक्षवेधक कामगिरी करणाऱ्या संघाना सुमारे ७.५ लाख रुपयांची बत्तिसे देण्यात येतील. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता 'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.० चे उ‌द्घाटन होणार आहे. तसेच या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर, तंत्रशिक्षण संचालनालयाचे (डीटीई) पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितली.

'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' विषयी अधिक माहिती देताना कल्पेश यादव म्हणाले, स्पर्धेसाठी एआयएसएसएमएस आयओआयटी महावि‌द्यालयाचे सहकार्य लाभले असून, त्यांच्या शैक्षणिक संकुलात स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्याऑनलाईन नोंदणीसाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यासाठी सुमारे ४०० संघांनी नोंदणीसाठी प्रतिसाद दिला. मात्र, गुणवत्तेला प्राधान्य देत त्यातील ३२७ संघाना स्पर्धेत प्रवेश दिला आहे. हे विद्यार्थी येत्या २२ आणि २३ फेब्रुवारी या दोन दिवशी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करतील. या विद्यार्थ्यांच्या राहण्याची तसेच नाष्टा, भोजनाची व्यवस्था इनोव्हेशन फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे अधिकाधिक आयटी कंपन्या, तसेच औ‌द्योगिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी स्पर्धेत सहभागी होऊन, विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला पाठिंबा ‌द्यावा, असेही आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.

'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' साठी सावित्रीबाई फुले पुणे वि‌द्यापीठ, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, तंत्रशिक्षण संचलनालय, रतन टाटा राज्य कौशल्य वि‌द्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान वि‌द्यापीठ, लोणेरे सीओईपी तंत्रशास्त्र वि‌द्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती वि‌द्यापीठ, तुकडोजी महाराज नागपूर वि‌द्यापीठ, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आदींचा पाठिंबा लाभला आहे. या स्पर्धेसाठी एज्युटेक, पर्यावरण, हेल्थकेअर, ट्रॅफिक मॅनेजमेंट, डिझासस्टर मॅनेजमेंट, अॅग्रिटेक अशा सहा संकल्पना असून, त्यातील प्रत्येकी पाच समस्या विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या समस्या सोडविण्यासाठी स्पर्धेमध्ये टिलेल्या वेळेत तंत्रज्ञानावर आधारित उपाय तयार करावे लागतील, असेही यादव यांनी सांगितले

यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार 'बालाजी जाधव' यांना..

दरवर्षी नवमाध्यमांच्या माध्यमातून कल्पकरित्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून पुरस्कार दिला जातो. यंदा 'इनोव्हेशन पुरस्कार' सातारा येथील माण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक बालाजी जाधव यांना दिला जाणार आहे. त्यांनी युटयुब चॅनेलच्या माध्यमातून प्राथमिक शाळेचे शिक्षण कसे सोपे होईल, यासाठी काम केले आहे. विविध नवकल्पनांच्या माध्यमातून शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या त्यांच्या या कार्यासाठी त्यांना यंदाचा इनोव्हेशन पुरस्कार दिला जाणार आहे.

स्टार्टअपना प्रोत्साहन

'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' ही स्पर्धा केवळ विजेत्यांच्या घोषणेपर्यंत थांबणार नसून, यातील निवडक प्रकल्पांना इनोव्हेशन फाउंडेशनच्या माध्यमातून स्टार्टअपच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाणार असल्याचे फाउंडेशनचे कल्पेश यादव यांनी सांगितले. या कल्पक उपक्रमांचे व्यवसायात रूपांतर होण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्यवसाय मार्गदर्शन, आर्थिक मदत अशा पध्दतिने  विद्यार्थ्यांना पुढे नेण्यात इनोव्हेशन फाउंडेशन हातभार लावणार आहे.

तंत्रज्ञानाचा वापर

यंदा नोंदणी झालेल्या संघांची संख्या लक्षात घेता. संघांच्या आगमनाची नोंद करण्यासाठी व रिअल टाइम ट्रॅकिंगसाठी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ऑनलाईन विकसित प्रणाली‌द्वारे स्पर्धा संपताच मिळू शकणार आहे.

एआय'साठी विशेष पुरस्कार, तसेच उ‌द्योगपती स्व. रतन टाटा यांच्या स्मरणार्थ पुरस्कार

स्पर्धेत सहभागी वि‌द्यार्थ्यांसाठी एकूण साडेसात लाख रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त रतन टाटा यांच्या स्मरणार्थ पन्नास हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. संपूर्ण स्पर्धेतून कल्पक अशा प्रकल्पाला 'रतन टाटा' इनोव्हेटिव्ह माईंड हा २५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे. तर एआय तंत्रज्ञानाचा कल्पक उपयोग करणाऱ्या प्रकल्पाला २५ हजार रुपयांचा पुरस्कार असणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने