दहावीची बोर्डाची आजपासून परीक्षा 

- 16 लाख विद्यार्थी देणार परीक्षा 

- राज्यातील ७०१ परीक्षा केंद्रांवरील संचालक आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल


- बेस्ट ऑफ लक 


पुणे , दि. 20(प्रतिनिधी ) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीच्या लेखी परीक्षेला उद्या  (दि. २१) पासून सुरूवात होत आहे. यंदा राज्यभरातून १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्येत २ हजार १६५ इतकी वाढ झाली आहे. एकूण २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.  राज्यातील ५ हजार १३० मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.


दहावीची लेखी परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते दि. १७ मार्च या कालावधीत होत आहे. बारावीप्रमाणे दहावीची परीक्षा देखील दहा दिवस लवकर सुरू होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अकरावी आणि इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोयीचे ठरेल. राज्यात एकूण ८ लाख ६४ हजार १२० मुले तर ७ लाख ४७ हजार ४७१ मुलींनी नोंदणी केली.  १९ तृतीयपंथीयांची नोंदणी झाली. सकाळच्या सत्रात ११ वाजता होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांनी ठीक १०.३० वाजता केंद्रावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या पेपरसाठी विद्यार्थ्यांनी २.३० वाजता केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन राज्य मंडळाकडून करण्यात आले आहे.


गतवर्षीच्या दहावी परीक्षेत १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा २ लाख १६५ इतकी विद्यार्थीसंख्येत वाढ झाली. विद्यार्थ्यांना पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटी दहा मिनिटे वाढवून देण्यात आलेली आहे. कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे परीक्षा केंद्रांवर वॉच ठेवला जाणार आहे.  गैरप्रकार आढळून येणाऱ्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनामार्फत व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अगोदर पुरेशी झोप घ्यावी आणि सकस आघार घेऊन तणावमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जावे. विद्यार्थी व पालकांनी सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन गोसावी यांनी केले.


-----------

चौकट : विभागनिहाय विद्यार्थी संख्या


पुणे : २ लाख ७५ हजार ४

नागपूर : १ लाख ५१ हजार ५०९

छत्रपती संभाजीनगर : १ लाख ८९ हजार ३७९

मुंबई : ३ लाख ६० हजार ३१७

कोल्हापूर : १ लाख ३२ हजार ६७२

अमरावती : १ लाख ६३ हजार ७१४

नाशिक : २ लाख २ हजार ६१३

लातूर : १ लाख ९ हजार ४

कोकण : २७ हजार ३९८ 

--_-----------


राज्यातील ७०१ परीक्षा केंद्रांवरील संचालक आणि पर्यवेक्षकांची अदलाबदल


राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियानांतर्गत दहावीच्या परीक्षेकरिता राज्यातील ७०१ परीक्षा केंद्रांवरील संचालक आणि पर्यवेक्षक अशा परीक्षेच्या कामाशी संबंधित कर्मचाऱ्यांची अदलाबदल केली आहे. राज्यात छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्वाधिक केंद्र बदलण्यात आली आहेत. तर कोकण विभागातील एकही केंद्र बदलण्यात आलेले नाही.

       राज्य शासनाने कॉपीमुक्त अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आत्तापर्यंत गैरप्रकार झालेल्या परीक्षा केंद्रांवरील संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित व्यक्तींची नियुक्ती ही इतर शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांमधून करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या मुख्य सचिवांनी घेतलेल्या बैठकीत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार बारावीच्या परीक्षेसाठी ८१८ परीक्षा केंद्रांवरील कर्मचाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली. तर दहावीच्या परीक्षेला ७०१ परीक्षा केंद्रावरचे कर्मचारी बदलण्यात आले आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने